Search
Close this search box.

Maharashtra CM Devendra Fadnavis: आता डेडलॉक संपलाय! एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वाक्याचा नेमका अर्थ काय? देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग कसा मोकळा झाला?

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भात बुधवारी रात्री दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री होणार ही बाब स्पष्ट झाली आहे. आता मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची घोषणा होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. मात्र, दिल्लीतील या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाराज देहबोली चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपली कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत आता डेडलॉक संपल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी उच्चारलेल्या ‘डेडलॉक’ या शब्दाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या विधानाचे विश्लेषण करताना ‘एबीपी माझा’च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी म्हटले की, जेव्हापासून विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून मुख्यमंत्री भाजपचाच होणार, ही अपेक्षा होती. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. परंतु, महाराष्ट्रातील राजकीय-जातीय समीकरणांचा विचार करता फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही, याबाबत किंतु परंतु होते. परंतु, दिल्लीतील कालच्या बैठकीने हे किंतु-परंतु संपुष्टात आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना आता डेडलॉक संपला, असा शब्द वापरला. याचा अर्थ सत्तास्थापनेत तिढा होता, हे मान्य केले. कालच्या बैठकीनंतर हा डेडलॉक संपल्याचे एकनाथ शिंदे यांना मान्य केले, याचा अर्थ कुठेतरी नाराजी होती. मात्र, भाजपच्या केंद्रातील नेत्यांच्या फोन कॉलमुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी संपली, असे सरिता कौशिक यांनी म्हटले.

या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले, त्यामुळे आता स्वत:खडे उपमुख्यमंत्रीपद घेण्याशिवाय भाजपकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. एक पक्ष म्हणून स्वत:चा विस्तार करणं हे भाजपसाठी महत्त्वाचे ध्येय आहे. इतकं मोठं यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत कसं बसवणार, पुन्हा त्यागाची भाषा करणे कठीण होते. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणे महत्त्वाचे होते. त्यानुसार आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे. मात्र, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. रितसर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असेही सरिता कौशिक यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी लवकरच भाजपचे केंद्रीय निरिक्षक मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदी कोण असेल याचं नाव निश्चित करुन औपचारिक घोषणा करतील. तत्पूर्वी  एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು