India-russia Deal : रशियाने सुखोई-75 आणि सुखोई 35 लढाऊ विमानांबाबत भारताला मोठी ऑफर दिली आहे. अमेरिका गेल्या अनेक महिन्यांपासून तेजस इंजिनच्या डिलिव्हरीला विलंब करत असताना रशियाने ही ऑफर दिली आहे. पीएम मोदींनीही त्यांच्या अमेरिका दौऱ्यात तेजस इंजिनचा मुद्दा उपस्थित केला होता.
अमेरिकेने तेजस लढाऊ विमानासाठी लागणाऱ्या इंजिनबाबत भारताला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या GE एरोस्पेस या कंपनीने आता भारताच्या स्वदेशी तेजस Mk1A फायटर जेटसाठी लागणाऱ्या इंजिनचा पुरवठा 2025 पर्यंत पुढे ढकलला आहे. यामुळे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भारतीय मिग-२१ विमाने निवृत्त होत असताना आणि दुसरीकडे चीनपासून पाकिस्तानपर्यंत मोठ्या प्रमाणावर आधुनिक लढाऊ विमाने त्यांच्या हवाई दलात समाविष्ट करत असताना भारताची अडचण वाढली आहे. अमेरिकेने भारताला धोका दिला असताना आता मित्र रशियाने भारताला आपल्या नवीन आणि अत्याधुनिक सुखोई विमानांसाठी मोठी ऑफर दिली आहे.
रशियाने भारताला त्यांचे सर्वात आधुनिक सुखोई-75 ‘चेकमेट’ आणि सुखोई-35 संदर्भात ही मोठी ऑफर दिली आहे. रशियाने सुखोई 75 हे लढाऊ विमान भारतात तयार करण्याची ऑफर दिली आहे. रशिया हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातक देश आहे आणि तो गमावू इच्छित नाही. दुसरीकडे, भारताने आपले F-35 लढाऊ विमान खरेदी करावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे, परंतु तेजस वादानंतर आता त्याच्या आशांना धक्का बसू शकतो. सुखोई-75 हे अमेरिकेच्या F-35 स्टेल्थ फायटर जेटला उत्तर मानले जाते.
एका विमानाची किंमत किती?
सुखोई-75 हे फायटर जेट प्रगत एव्हीओनिक्स आणि एआयने सुसज्ज आहे. या एका विमानाची किंमत सुमारे 30 ते 35 दशलक्ष डॉलर्स आहे. हे अमेरिकन F-35 (82.5 दशलक्ष) च्या निम्म्याहून कमी आहे. रशिया आणि भारत यांच्यात जर हा करार होतो तर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध टाकले आहे. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे. पण जर भारताने ही डील केली तर रशियाच्या अर्थव्यवस्थेला मदत मिळणार आहे. यासोबतच भारत देखील या विमानाची निर्यात करून पैसा कमवू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रशियाने अनेक दशकांपासून भारताला मिग ते सुखोई अशी अनेक लढाऊ विमाने पुरवली आहेत. सुखोई 2025 मध्ये होणाऱ्या एरो इंडिया 2025 प्रदर्शनात आपले Su-75 सादर करणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की रशिया भारताला हे अत्याधुनिक विमान आपल्या देशात बनवण्याची ऑफर देणार आहे. ज्यामुळे भारत ते इतर देशांना देखील विकू शकेल. रशिया आपला जवळचा मित्र चीन याची पर्वा न करता भारताला ही ऑफर देत आहे.
Author: VS NEWS DESK
pradeep blr