Search
Close this search box.

जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव

मुंबई : धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मालाड, मालवणीतील अक्सा गावातील १४० एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार बुधवारी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक जमीन मोजणीसाठी अक्सा गावात गेले असताना स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केला. नागरिकांनी पथकाला घटनास्थळावरून पिटाळले. दरम्यान, जमीन मोजणीवर जिल्हाधिकारी कार्यालय ठाम असून एक-दोन दिवसांत पोलीस बंदोबस्तात प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकासांतर्गत अपात्र रहिवाशांचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या रहिवाशांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारने अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला, देवनार आणि मालाड-मालवणी अशा ठिकाणची शेकडो एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडला (डीआरपीपीएल) देण्यात आली आहे. यात मिठागर आणि कचराभूमीच्या जागेचाही समावेश आहे. मात्र, या जागा धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी देण्याच्या, वापरण्याच्या निर्णयाला मुलुंडसह सर्व ठिकाणच्या रहिवाशांचा प्रचंड विरोध आहे. यासाठी स्थानिकांनी जनआंदोलनही केले आहे. दरम्यान, मालाड, मालवणीतील अक्सा गावात याच मुद्द्यावरून बुधवारी गोंधळ झाला. अक्सा गावातील १४० एकर जागा धारावी पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे, याअनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक पथक बुधवारी सकाळी अक्सा गावात दाखल झाले. पथकाने जमिनीची मोजणी करण्यास सुरुवात केली. मात्र, या मोजणीची माहिती मिळताच काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्यासह स्थानिक आणि कोळी बांधवांनी मोजणीच्या ठिकाणी धाव घेऊन मोजणीला जोरदार विरोध केला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट मिळालेल्या अदानी समूहासह राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. काही वेळातच परिसरात गोंधळ सुरू झाला आणि स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोजणी पथकाची प्रक्रिया थांबविण्यात आली. त्यानंतर, स्थिती नियंत्रणात आली.

अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी जागा देण्यास अक्सामधील स्थानिक, मच्छीमारांचा विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मालाडमधील भाटी मच्छीमार ग्राम विकास मंडळाची काही छायाचित्रे सध्या समाजमाध्यमांवर झळकत आहेत. त्यात धारावी प्रकल्प मालाडमध्ये राबवण्यास विरोध करणाऱ्या उमेदवारालाच आम्ही मतदान करू. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थकांनी आमच्या गावात मते मागायला येऊ नये. महायुतीच्या उमेदवाराने धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करूनच मते मागण्यासाठी यावे, अशा आशयाचे फलक लागले आहेत.

अक्सा येथील जमीन धारावी पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालाय सुरू करील. यात आचारसंहितेचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. नियमानुसार, मोजणी सुरू होती. मात्र, स्थानिकांच्या विरोधानंतर आम्ही तूर्तास मोजणी थांबवली आहे. परंतु, एक-दोन दिवसांत पोलीस बंदोबस्तात मोजणीला सुरुवात होईल आणि मोजणी पूर्ण होईल. – राजेंद्र क्षीरसागर, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr

ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಸುದ್ದಿ

ಕ್ರಿಕೆಟ್ ಲೈವ್ ಸ್ಕೋರ್

ಚಿನ್ನ ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿ ಬೆಲೆಗಳು