निलेश पाटील, जळगाव: जळगाव शहरात गुरुवारी पोलिसांनी एका व्यक्तीकडून बोहरा गल्ली परिसरातून २५ लाखाची रोकड जप्त केली असून ही व्यक्ती जळगाव जिल्ह्यातील एका पक्षाच्या उमेदवाराच्या संस्थेतील क्लर्क असल्याची चर्चा आहे. शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका व्यक्तीकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती सदर एका बॅगमध्ये २५ लाखाची रोकड घेऊन जात होता. पोलीस गुप्त माहितीच्या आधारे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आणि त्याला बोहरा गल्लीमध्ये पकडण्यात आले.
परंतु, सदर व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलीस ठाण्यात आणलं. प्रमोद पवार या व्यक्तीची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने एवढी रक्कम कुठून आणली ही रक्कम तो कुठे घेऊन जात होता. या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठी रक्कम बाळगण्यास प्रतिबंध असल्याने या कारवाईची माहिती शनिपेठ पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या असलेल्या भरारी पथकाला दिली. ही रोकड याच पथकाकडे देण्यात येणार असल्याचं रंगनाथ धारबळे यांनी सांगितले.
प्रमोद पवार यांच्याकडून २५ लाखाची रोकड सापडली असल्याने ही रोकड जिल्ह्यातील एका राजकीय बड्या नेत्याची असल्याची चर्चा सुरू आहे. प्रमोद पवार हा पारोळा तालुक्यातील ना. शी मंडळ या शैक्षणिक संस्थेत क्लर्क देखील आहे. ही जी संस्था आहे ही एका राजकीय नेत्याची संस्था असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही रोकड नेमकी कोणत्या नेत्याची आहे, याची कसून चौकशी पोलीस करीत आहे.
Author: VS NEWS DESK
pradeep blr