Search
Close this search box.

मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’; महायुतीसोबत जाण्याचं राज’कारण’

मुंबई : मनसेनं यंदाच्या निवडणुकीत गेल्या 2 विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त उमेदवार मैदानात उभे केले आहेत. तसेच, निवडणूक निकालानंतर यंदा मनसे हा सत्तेतील पक्ष असेल, असा विश्वासही राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला किती जागा जिंकता येतील, मनसे किती जागांवर विजय मिळवेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यातच, राज ठाकरेंकडून (Raj Thackeray) उमेदवारांसाठी सभांचा धडाका सुरू असून मुंबईतील माहीम मतदारसंघात त्यांनी आपला पुत्र अमित ठाकरे यांनाही विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणूक आणखी रंगतदार बनली आहे. त्यातच, एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपसोबत (BJP) कंम्फर्टेबल आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्याअगोदर त्यांनी पार्श्वभूमी समजावून सांगताना भाजपच्या जुन्या दिग्गज व काही दिवंगत नेत्यांची नावे घेत, त्यांच्यापासून माझे भाजप नेत्यांशी जवळचे संबध राहिल्याचंही ते म्हणाले.

महायुती किंवा आघाडीचे तुम्ही गेल्या 10 ते 15 वर्षांपासूनचे जाहीरनामे काढून पाहा. निवडणूक काळातील आजच्या जाहीरनाम्यात त्यांनी जे आश्वासन दिले आहेत, तेच आश्वासन यापूर्वीही दिले आहेत. मी तेवढं बोलतो, जे शक्य आहे. जे मी करू शकतो त्या गोष्टी मी भाषणातून बोलत आहेत, पण यांच्याकडून गेल्या 10 ते 15 वर्षांपासूनचं तेच तेच सांगण्यात येत आहे. जर 10 ते 15 वर्षांपासून त्याच गोष्टी तुम्ही सांगत असाल तर त्या अडचणी आत्तापर्यंत का संपुष्टात आल्या नाहीत, असेही राज ठाकरेंनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत मनसेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, विधानसभेला तुमचं गणित जुळलं नाही का, असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, मी लोकसभेसाठी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता, पण विधानसभेला आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार हे अगोदरच मी स्पष्ट केलं होतं.

मी भाजपसोबत कंम्फर्टेबेल

मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा मुख्यमंत्री होणार असे विधानही राज ठाकरेंनी केलं होतं. त्यासंदर्भात बोलताना, सध्याचं वातावरण तसं आहे, ज्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार हे आमच्या पाठिंब्याशिवाय स्थापन होऊ शकणार नाही. जर विषय भाजपचा असेल तर, सुरुवातीपासूनच मी जेव्हा शिवसेनेत होतो, तेव्हापासून माझा पक्ष काढल्यानंतरही माझे चांगले संबंध कोणाशी राहिले तर ते भाजपासोबत. प्रमोद महाजन, गोपीनाथराव, नितीनजी असतील किंवा अटलजी असतील, अडवाणीजी असतील या सर्वच नेत्यांसोबत माझे सुरुवातीपासून संबंध आले, ते भाजप नेत्यांसोबतच. माझे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत कधी जवळचे संबंध आले नाहीत. त्यामुळे, आपल्यासाठी एक कम्फर्ट झोन असतो, मला वाटतं भाजपसोबत मी पहिल्यापासून कम्फर्टेबल आहे, ज्यांसोबत मी चर्चा करू शकतो. माझा पक्ष हा महायुतीबाहेरचा पक्ष आहे, पण मी कंम्फर्ट झोन कुठे पाहतो तर भाजपसोबत, असे राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच, काँग्रेसमधील नेते एकमेकांसोबतही चर्चा करत असतील,असं वाटत नाही, असा टोलाही काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी लगावला.

VS NEWS DESK
Author: VS NEWS DESK

pradeep blr