मुंबई: राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा जोर आरोप करतात, त्याला काय आधार आहे. कोणीतरी काहीतरी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या जातीयवादाच्या आरोपांना सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.
माझ्या नेतृत्त्वाखाली पक्ष चालत होता, सरकारही चालत होते. तेव्हा आम्ही कोणाकोणाला प्रोत्साहन दिले. त्यावेळेस आमच्या पक्षात विधिमंडळात नेतृत्व निवड करायची होती. तेव्हा आम्ही मधुकर पिचड, छगन भुजबळ यांना नेता बनवलं. विविध जातीच्या लोकांना आदिवासी, दलित, ओबीसींना संधी दिली. आमचा दृष्टीकोन नेहमी व्यापक होता आणि आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतात, त्याला काय आधार आहे, मला माहिती नाही. ते काहीही स्टेटमेंट ठोकून देतात. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना काहीतरी असेल बुवा असे वाटते. तोच त्यांचा हेतू असावा, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज ठाकरेंना फटकारले.
यावेळी शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आणखी एका आरोपला उत्तर दिले. पुण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना डोक्यावरील पुणेरी पगडी काढून फुले पगडी घालायला लावली. हाच शरद पवार यांचा जातीयवाद आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, तो कार्यक्रम महात्मा फुले यांचा होता, त्यांच्या विचारांचा होता. त्या कार्यक्रमात मला स्वत:ला आणि इतर सगळ्यांना फुले पगडी घालण्यात आली. त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जरुर बोललो की, माझ्या डोक्यावर फुले पगडी घातली, याचा मला आनंद आहे. पगडी हे काही जातीधर्माचं लक्षण नाही. त्यामुळे फुले पगडी वापरा आणि त्याचा आनंद आहे, अशाप्रकारचं वाक्य बोललं तर लगेच आपण जातीयवादी होतो? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संपूर्ण जीवनात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन नेण्याचे काम केले. त्यांनी कधीही जातीवर आधारित वक्तव्य केल्याचे माझ्या वाचनात नाही. त्यामुळे महात्मा फुले आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांच्या पेहरावातील एखादी गोष्ट केली तर त्याला लगेच त्याला जातीयवादी बोलायचे, याला फारसा अर्थ नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
Author: VS NEWS DESK
pradeep blr