Donald Trump On PM Modi US Visit : जागतिक राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. यादरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय राजधानीतील घाणीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवासांत पीएम मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेते ट्रम्प भेटण्यासाठी वॉशिंग्टन येथे गेले होते. या नेत्यांना वॉशिंग्टन येथील सरकारी इमारतीजवळचे तंबू, भिंतींवरील ग्रॅफिटी किंवा रस्त्यावरील खड्डे दिसू नयेत अशी आपली इच्छा होती असे ट्रम्प शुक्रवारी बोलताना म्हणाले आहेत. यासाठी व्हाईट हाऊसकडे येण्याचा त्यांचा रस्ता बदलला होता आणि याबरोबरच शहर स्वच्छ करण्याचे आदेश देखील दिले होते असा खुलासाही ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटमध्ये शुक्रवारी भाषण देताना ट्रम्प म्हणाले की, “आम्ही आपल्या शहराची स्वच्छता करत आहोत. आम्ही आपल्या राजधानीची स्वच्छता करत आहोत, आणि आम्ही येथे गुन्हे होऊ देणार नाहीत आणि गुन्हे पाठीशी घालणार नाहीत. आम्ही शहरातील भिंतींवरील ग्रॅफिटी काढून टाकणार आहोत, यापूर्वीच आम्ही तंबू काढून टाकण्यास सुरूवात केली आहे आणि आम्ही प्रशासनाबरोबर मिळून हे काम करत आहोत.” यावेळी वॉशिंग्टन डीसीचे मेयर म्युरियल बॉवसर हे राजधानी स्वच्छ करण्यासाठी चांगले काम करत असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
“आम्ही म्हणालो की स्टेट डिपार्टमेंटच्या समोरच तंबू उभारण्यात आले आहेत. ते काढून टाकले पाहिजेत आणि त्यानंतर लगेचच ते हटवण्यात आले…. जगभरात चर्चा होईल अशी राजधानी आपल्याला हवी आहे,” असेही ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले.
ट्रम्प म्हणाले की, “जेव्हा भारताचे पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे अध्यक्ष हे लोक…युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हे सर्व मागील एक ते दीड आठवड्यापूर्वी भेटायला आले होते आणि जेव्हा ते आले…तेव्हा मी त्यांचा रस्ता बदलला होता. माझी इच्छा नव्हती की त्यांनी तंबू पाहावेत. माझी इच्छा नव्हती की त्यांनी भिंतीवरील ग्रॅफिटी पाहाव्या. माझी इच्छा नव्हती की त्यांनी रस्त्यावरील तुटलेले बॅरियर आणि खड्डे पाहावेत. आम्ही ते सुंदर बनवले.”
ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही शहरासाठी हे करणार आहोत आणि आपली राजधानी गु्न्हेगारी मुक्त असेल. जेव्हा लोक येथे येतील तेव्हा त्यांच्याबरोबर लुटपाट किंवा गोळीबार किंवा बलात्कार होणार नाहीत. त्यांना गुन्हेगारी मुक्त राजधानी मिळेल, जी पूर्वीपेक्षा कितीतरी स्वच्छ, चांगली आणि सुरक्षित असेल आणि त्यासाठी फार वेळ लागणार नाही.