महिला दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र टाइम्स संपूर्ण महिनाभर महाराष्ट्रातील कर्तृत्ववान आणि संघर्षशील महिलांच्या प्रेरणादायी कथा उजळवत आहे. आज आपण भेटणार आहोत एका धाडसी आणि परिवर्तन घडवणाऱ्या महिला भाग्यश्री मनोहर लेखामी यांना, ज्या आपल्या कार्याने नक्षलग्रस्त भागाचे चित्र बदलत आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील कोटी गावाची २६ वर्षीय सरपंच भाग्यश्री लेखामी यांनी अनेक अडचणींवर मात करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांनी बालविवाह थांबवणे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, आरोग्य सेवा सुधारणे आणि वीज व शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या कामांवर भर दिला आहे.
२०१९ मध्ये आदिवासी समाजाने त्यांना एकमताने सरपंच म्हणून निवडले, तेव्हा त्या अवघ्या २१ वर्षांच्या होत्या. सुरुवातीला त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. गावातील लोक आणि सरकारी यंत्रणा त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत होते. मात्र, आपल्या साहस, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर भाग्यश्री यांनी परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली. भाग्यश्री लेखामींची ही प्रेरणादायी कहाणी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने आणि तरुणीने ऐकावी अशी आहे. तिने दाखवून दिले की आत्मविश्वास, शिक्षण आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती बदलता येऊ शकते.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोटी गावाची२६ वर्षीय सरपंच भाग्यश्री मनोहर लेखामी आज अनेक गावांचे भविष्य बदलण्यासाठी मेहनत घेत आहे. हे संपूर्ण आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्र आहे, जिथे लोक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. भाग्यश्री गावकऱ्यांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि वीज उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र झटत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यास मोठी मदत झाली आहे.