चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेले पाच मुले तलावात बुडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शनिवारी (दि.१५) सायंकाळ चारच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाले असून वृत्त लिहीपर्यंत शोध मोहीम सुरू झालेली नव्हती. ५ मुले ही जिल्ह्यातीलच चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील होती. जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ आहेत. हे चार जण जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राच्या समावेश आहे.
घोडाझरी या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते. शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात. आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साट गाव कोलारी येथील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती.
दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले. त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली हा १६ वर्षाचा मुलगा कसाबसा वाचला. तर उर्वरित जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे , अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली.
पाच मुलांपैकी चार गावंडे कुटुंबातीलच आहेत. त्यामध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे. सर्व मुले 18 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत. तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने ही घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाचही मुले तलावातच बुडालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू केली असून वृत्त लिहीपर्यंत शोधमोहीम सुरू झालेली नव्हती.