अभिनेता अक्षय कुमार ‘बिग बॉस 18’च्या सेटवर ग्रँड फिनालेच्या शूटिंगसाठी पोहोचला होता. त्याने सेटवर तासभर प्रतीक्षा केली अन् अखेर शूटिंग न करताच तो तिथून निघून गेला. बिग बॉसच्या टीमकडून त्याला नंतर अनेक फोन कॉल्स करण्यात आले. मात्र त्याने शूटिंगला यायला नकार दिला.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस 18’चा सूत्रसंचालक सलमान खान सेटवर उशीरा पोहोचल्याने अक्षय कुमार तिथून शूटिंग न करताच निघून गेला. अक्षय त्याच्या वेळापत्रकाबाबत खूपच सजग असतो, हे सर्वांनाच माहीत आहे. सेटवर वेळेचं तंतोतंत पालन होण्यासाठी तो आग्रही असतो. यानुसार तो दुपारी 2.15 वाजता बिग बॉसच्या सेटवर शूटिंगसाठी पोहोचला होता. मात्र तेव्हा सलमान सेटवर उपस्थित नव्हता. अक्षयने जवळपास तासभर सलमानची प्रतीक्षा केली. मात्र तरीसुद्धा सलमान सेटवर न आल्याने तो तिथून निघाला.
अक्षय कुमारला आगामी ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायचं होतं. म्हणून तो बिग बॉसच्या सेटवर अधिक वेळ प्रतीक्षा करू शकला नाही. नंतर बिग बॉसच्या टीमकडून अक्षय कुमारला पुन्हा सेटवर बोलावण्यासाठी अनेक फोन कॉल्स करण्यात आले. मात्र अक्षयने शूटिंग करण्यास नकार दिला. अक्षय आणि सलमान यांनी आपापसांत चर्चा केली. त्यावेळी अक्षयने त्याला त्याच्या शूटिंगच्या वेळापत्रकाबद्दल समजावून सांगितलं. अक्षय कुमारनंतर वीर पहाडियाने बिग बॉसचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानेच टॉप 5 स्पर्धकांची नावं घोषित केली.